दिवाळीत फटाके वाजवणे परंपरा:Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे भारतीय प्राचीन परंपरा आहे का?

दिवाळीत फटाके वाजवणे  परंपरा

दिवाळीत फटाके वाजवणे

दिवाळीत फटाके वाजवणे परंपरा वायुप्रदूषणासाठी फटाके मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात, या आधुनिक काळात भारतात फटाके सहज उपलब्ध आहेत

. सर्वांना परवडणारे आहेत. परंतु कधी काळी या फटाक्यांचा वापर सामान्य लोकांसाठी सहज आणि सोपा नव्हता. त्यामुळेच भारतीय इतिहासातील फटाक्यांचा बदलणारा प्रवास जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

भारतीय सण हे ऋतूबदलाचे द्योतक असतात. आज जरी या सणांचे मूळ महत्त्व विस्मरणात जावून केवळ बाह्य उत्सवाचे स्वरूप शिल्लक राहिलेले असले तरी, भारतीय संस्कृतीच्या प्राचीन रचनाकारांनी निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करून निसर्गातच आढळणाऱ्या गोष्टींच्या सहाय्याने हे सण कसे साजरे केले जावेत याची मांडणी केली होती, याला दिवाळी देखील अपवाद नाही.

तेल-उटण्याने केलेले अभ्यंग स्थान, स्निग्धता वाढविणारा फराळ, दिव्यांची आरास या सर्व गोष्टींमागे निसर्गात होणारे परिवर्तन दडलेले आहे. परंतु काही गोष्टी सणाच्या निमित्ताने जोडल्या जातात, आत्मसात केल्या जातात आणि संस्कृतीचा भाग होतात. यात भल्या- बुऱ्या अशा दोन्ही परंपरांचा समावेश असतो.

सध्या दिवाळीच्याच निमित्ताने एक मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे फटाक्यांचा. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणामुळे न्यायालयाकडून फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

यामुळे अनेक स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, हिंदू सणांच्या वेळीच असे नियम कसे येतात इत्यादी. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवसांत फटाके वाजविणे ही परंपरा प्राचीन आहे का? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

फटाके लोकप्रिय का?

फटाक्यांच्या इतिहासाविषयी ‘अ शॉर्ट हिस्टरी ऑफ फायरवर्क्स इन अमेरिका’ या पुस्तकात लिहिताना लेखक आणि इतिहासकार जॅक केली हे अग्नीचे महत्त्व विशद करतात. ते लिहितात अग्नी आपल्या चिंता आणि स्वप्ने दोन्ही भस्मसात करतो.

अग्नी मानवाशी जलदगतीने संवाद साधतो. अग्नी केवळ पवित्र आणि भयंकरच नाही, तर अग्नी त्याच्या तेजस्वी रूपात मनोरंजनाचेही काम करतो. म्हणूनच उत्सवाच्या दिवसातील प्रकाश आणि फटाक्यांची रात्र जगाला सतत मंत्रमुग्ध करते यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

फटाक्याचा शोध नेमका कोणाचा?

भारतात कुठलाही सण असो विशेषतः दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा वापर नेहमीच होताना दिसतो. किंबहुना हा आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो.

अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार इसवी सनाच्या १४ व्या शतकात भारतीय युद्धात ‘बारूद’ वापरला जावू लागला. याविषयी सविस्तर संशोधन पी. के. गोडे यांनी १९५० साली लिहिलेल्या “हिस्टरी ऑफ फायर वर्क्स इन इंडिया बिटवीन १४०० अँड १९००” या शोध निबंधात मांडले आहे. फटाक्यांचा वापर भारतात १४ व्या शतकापासून करण्यात येऊ लागला असे नमूद करण्यात आलेले आहे.

दिवाळीत फटाके वाजवणे प्राचीन परंपरा

१४ व्या शकापूर्वी भारतात फटाके होते का?

अगदी प्राचीन काळापासून सोरामीठ (Saltpetre- KNO3) वापरण्याचा इतिहास आहे. भारतातही सोरामीठाचा वापर अश्मयुगीन काळापासून होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जातो.

प्राचीन भारतात वेगवेगळ्या शस्त्रांमध्ये याचा वापर केला जात होता, याचे पुरावे शुक्रनीति, कौटिल्याचे अर्थशात्र यांसारख्या ग्रंथामध्ये सापडतात. त्यामुळे प्राचीन भारतीयांना युद्धभूमी किंवा तत्सम शस्त्रांसाठी लागणारी स्फोटके तयार करण्याचे ज्ञान होते हे सिद्ध होते.

येथे लक्षात घेण्याच्या मुद्दा असा, चीनकडे फटाक्यांचा मनोरंजनासाठीच्या वापराचे आणि निर्मितीचे श्रेय जाते.

पौराणिक संदर्भ

या कालखंडातील पौराणिक कथांमध्ये, काव्यामध्ये फटाक्यांचा, आतषबाजीचा संदर्भ सापडतो. त्यामुळे या कथांच्या लेखकांना, कवींना फटाके आणि आतषबाजी यांचे ज्ञान असल्याचे समजते.

१६ व्या शतकात संत एकनाथ स्वामी यांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ या काव्यात रुक्मिणी आणि श्री कृष्णाच्या विवाहाच्या वेळेस वापरल्या गेलेल्या रॉकेटपासून आधुनिक फुलबाज्या सारख्या समतुल्य फटाक्यांच्या श्रेणीचा उल्लेख केला आहे.

दिवाळीसाठी सार्वजनिक आतषबाजी

अठराव्या शतकापर्यंत, राज्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मोठ्या दिवाळी कार्यक्रमांमध्ये मनोरंजनांसाठी फटाके वाजवले जावू लागले. पेशव्यांची बखर या मराठा इतिहासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ग्रंथात कोटाह (आधुनिक कोटा, राजस्थान) मधील दिवाळी उत्सवाचा उल्लेख आहे.

या बखरीत महादजी सिंधिया (शिंदे) पेशवे सवाई माधवराव यांचे वर्णन करतात, या वर्णनात दिवाळीचे संदर्भ येतात. या संदर्भानुसार “दिवाळी सण कोटा येथे ४ दिवस साजरा केला जातो, त्यावेळेस लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. या ४ दिवसांत कोटाचा राजा त्याच्या राजधानीच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करतो. त्या आतषबाजीला… “फटाक्यांची लंका” म्हणतात.

याच कार्यक्रमात महादजी सिंधिया यांनी मध्यभागी उभारलेल्या रावणाच्या प्रतिमेचे वर्णन केले आहे, मूलतः हे लंकादहनाचे दृश्य आहे. एकूणच दिवाळ सणाच्या दिवशी कोटा मध्ये फटाक्यांच्या माध्यमातून लंका दहन केले जात होते. हे ऐकून पेशव्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी अशाच प्रकारे फटाक्यांची आतषबाजी करण्याचा आदेश दिला.

परिणामी दिवाळीच्या दिवसात पुण्याची जनता भव्य फटाक्यांच्या आतषबाजीसाठी साक्षीदार ठरली होती. एकूणच मुघलांच्या आगमनानंतर फटाक्यांच्या सार्वजनिक आतषबाजीच्या कार्यक्रमांचे प्रस्त वाढलेले दिसते. तत्पूर्वी सार्वजनिकरित्या आतषबाजीचे कार्यक्रम होत होते याविषयी तुरळक उदाहरणे उपलब्ध आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!