राज्यात मराठा कुणबीच्या नोंदी
मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकारची सुटका नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा
अलिबाग : राज्यात मराठा कुणबीच्या नोंदी मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यसरकारची सुटका नाही.
ज्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत.
अजूनही सापडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे.
असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोपोली या गावात व्यक्त केला.
राज्यात मराठा कुणबीच्या २९ लाख नोंदी
सरकारने २४ डिसेंबर या तारखे पर्यंत आरक्षण नाही दिले तर २५ डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, पण त्या आगोदर १ डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषणाची तयारी करा असे आवाहन जरंगे पाटलांनी समाजबांधवांना केले.
गेली सत्तर वर्ष पुरावे सापडत नव्हते आता प्रत्येक जिल्ह्यात पुरावे सापडत आहेत.
ज्यात १८०५ पासून १९६७ पर्यंतच्या जुन्या नोंदीचा समावेश आहे.
सरकार पुर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. पहीला अहवाल गेला आहे.
दुसरा तयार होतो आहे. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना लगेच दाखले वाटप सुरू झाले आहे.
त्यामुळे आरक्षण दृष्टीक्षेपात आले आहे. त्यामुळे आता मागे हटू नका, एकजूट कायम ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यात मराठा कुणबीच्या २९ लाख नोंदी सापडल्यावर मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे.
त्यामुळे जिवाची पर्वा न करता मी या लढ्यात उतरलो आहे. गेली ७० वर्ष आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे मोठं नुकसान झाले आहे. यापुढे होऊ देणार नाही.
आरक्षणासाठी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. मागे हाटू नका, आरक्षणासाठी एकजूट ठेवा, राजकारण बाजूला ठेवा,
आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, मी तुमच्या जिवावर लढतोय. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, शांततेच्या आंदोलनात ताकद मोठी आहे असेही ते म्हणाले.
मराठा समाजाची मी वेदना मांडतो. त्यामुळे सरकारसह सर्वांनी मला शत्रू मानले आहे
पण मी त्याला फारसे महत्व देत नाही. एकदा आरक्षण मिळू द्या मग बोलू, मराठा आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्याही मराठ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
आजची भव्य सभा याचेच द्योतक आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, ओबिसींशी समाज बांधवांशी वाद घालू नका.
भांडू नका. राजकीय स्वार्थासाठी तणाव निर्माण होऊ देऊ नका. आरक्षणाची लढाई आपण ७० टक्के जिंकलोय, आरक्षण सोपा विषय नाही,
जितकी प्रॉपर्टी महत्वाची तितकेच आरक्षण महत्वाचे त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत घ्यायचेच असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी संबोधीत करतांना त्यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता तोंडसूख घेतले.